॥ साक्षात भीमसेविका घरी येते तेव्हा ॥

(०४ – ०३ – २०२५) अचानक लेडी गव्हर्नर कमलताई गवई घरी येऊन गेल्या. प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचा फोन आला की ताई तुमच्या घरी येऊ इच्छितात. परभणीत कृषी विद्यापीठातल्या कार्यक्रमानिमित्त त्या आलेल्या होत्या आणि सदिच्छा भेटीसाठी त्या माझ्या घरी येऊ इच्छित होत्या. मला अर्थातच आनंद झाला. म्हटलं, या. बरोबर साडेचार वाजता त्या माझ्या घरी आल्या.

कमलताई या महाराष्ट्रातले जुने रिपब्लिकन नेते, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष असलेले, नंतर सतत तीस वर्षे आमदार म्हणून निवडून आलेले, दोन वेळा खासदार झालेले, केरळ, सिक्कीम आणि बिहारचे राज्यपाल राहिलेले स्मृतीशेष रा. सू. गवई यांच्या सहधर्मचारिणी आहेत. रा. सू. गवई यांनी प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. कमलताईही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून होत्याच. कमलताई अमरावतीच्या महाविद्यालयात प्राचार्य होत्या. एका बाजूला रा. सू. गवई यांच्या जशा त्या सहधर्मचारिणी तशाच सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या त्या आई आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा यांनी रा. सु. गवई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही राजस किस्से मला सांगितलेले होते. गवई विधानसभेचे सभापती असताना आबा तेव्हा साधे आमदार होते. ते किस्से कधीतरी लिहिण्यासारखे आहेत.

सध्या कमलताईंचं वय ८५ वर्षे आहे. तरीही त्या फिरतात. त्यांची शैक्षणिक आणि सामाजिक कामं सुरूच आहेत. त्यांचं राहणं, वागणं, बोलणं अगदी निरागस आणि निगर्वी. जिथे मुक्काम होईल तिथे साध्या घरात राहणं, अंगावरचे कपडेही तितकेच साधे. स्वभावही तितकाच साधा, सरळ. त्यामुळे होत्या तितक्या वेळात त्यांचं व्यक्तिमत्व आम्हाला भाराऊन गेलं.

त्यांना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याचे समजल्यामुळे मलाही वाटलं की, आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे. म्हणून सौ. गया, सुनबाई गायत्री आणि मी असा आम्ही कमलताईंचा सत्कार केला. त्यांना भेट देण्यासारखी एक गोष्ट माझ्याकडे होती, ती म्हणजे माझं नुकतच कबीरावर आलेलं पुस्तक. ते मी त्यांना भेट दिलं. नातूऋतू हे पुस्तक मी नरेशचंद्र काठोळे सरांना भेट दिलं, तेव्हा कमलताई म्हणाल्या मलाही ते पुस्तक द्या. मी ते अर्थात आनंदानं त्यांना दिलं. बालकवीतेचं त्यांना कशाला द्यायला पाहिजे, म्हणून मी टाळत होतो. पण त्यांनी मागून घेतलं याचा मला खूप आनंद वाटला.
घरात होत्या तेवढा वेळ गया, गायत्री आणि आमचा नरेन यांच्याशी त्या अगदी वात्सल्यपूर्ण वागल्या.

त्यांच्यासोबत असलेल्या प्रा. डाॅ. नरेशचंद्र काठोळे यांनी कबीराच्या पुस्तकाच्या काही प्रति विकत घेतल्या. ते नेहमीच ग्रंथप्रसार करतात. आवडलेली पुस्तकं विकत घेतात आणि आपल्या मित्रांना वाटतात. मागच्या वेळी आले तेव्हा त्यांनी ‘तुमची आमची माय’ हे पुस्तक विकत घेतलेलं होतं आणि अनेकांना भेट दिलेलं होतं. यावेळी त्यांनी कबीर लोकांपर्यंत पोहोचवायचा असं ठरवलेलं दिसतय.

प्रत्यक्ष बाबासाहेबांसोबत काम करणाऱ्या कमलताई सारख्यांची तासाभराची का होईना ही भेट आम्हाला खूप समृद्ध करून गेली. आम्ही तर अक्षरशः भारावून गेलो होतो. माझ्या डोळ्यासमोर सतत बाबासाहेबांच्या सहवासातल्या कमलताई दिसत होत्या. रा. सु. गवई यांच्या सहवासातल्या कमलताई दिसत होत्या. मी मनोमन त्यांना वंदन केलं आणि प्रत्येक्षातही त्यांना वंदन केलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Review Your Cart
0
Add Coupon Code
Subtotal
Total Installment Payments
Bundle Discount

 
Scroll to Top